प्रत्येकाकडून शिकावे !!!

 प्रत्येकाकडून शिकावे !!!

इतिहासात अनेक व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. काही पराक्रमी, शूर, उदार व सद्गुणी होती, तर काही क्रूरकर्मा आणि कपटी अशीही होती. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे औरंगजेब.


संत महात्मा म्हणतात, प्रत्येकामध्ये ईश्वराने कोणता ना कोणता सद्गुण भरलेला आहे. म्हणून प्रत्येकाकडून काहीना काही शिकण्यासारखे आहे. सद्गुरु माताजींनी देखील म्हटले आहे, की 'कणकण से शिक्षा'


तर मग या औरंगजेबाकडून अशी कोणती गोष्ट आपल्याला शिकता येण्यासारखी आहे? 


औरंगजेब जसा मुत्सद्दी आणि क्रूरपणाबद्दल प्रसिद्ध होता तसा तो साधी राहणी व धार्मिकपणा याबद्दल देखील प्रसिद्ध होता; त्याच्यात धार्मिकता जरी असली तरी धर्मांधता अधिक असल्यामुळे तो इतिहासात कुप्रसिद्ध झाला. औरंगजेब नियमितपणे नमाज अदा करत असे. रोज वेळेवर मशिदीत जाऊन नमाज पढणे हा त्याचा कार्यक्रम होता. एके दिवशी काही कारणाने त्याला मशिदीत यायला उशीर झाला. जेव्हा तो मशिदीत शिरला तेव्हा बादशहा आलेला आहे हे कळताच अगोदर आलेले लोक उठू लागले व बादशहाला जागा देऊ लागले; पण औरंगजेब बादशाह त्यांना नम्रपणे म्हणाला, "कोणीही उठू नका, कारण तुम्ही माझ्या आधी आलेला आहात. तेव्हा मी तुमच्या जागी बसणं योग्य नाही. मी पाठीमागे बसूनच नमाज पढतो. कारण या ठिकाणी मी सम्राट नाही तर खुदाचा बंदा आहे.” औरंगजेब सर्वांच्या शेवटी बसूनच नमाज पढला. 


औरंगजेबाची आणखी एक विशेषता अशी होती की, तो दानधर्म देखील करायचा; पण दानधर्म प्रजेच्या पैशातून न करता स्वतःच्या कष्टाच्या पैशाने करावा हा त्याचा नियम होता आणि त्यामुळेच तो फावल्या वेळेत टोप्या विणत असे. विणलेल्या टोप्या विकून जे पैसे येतील त्यातून दानधर्म करीत असे. 


मित्रांनो, याठिकाणी एक गोष्ट मात्र खरोखरच शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे एवढा मोठा सम्राट असूनही औरंगजेब जसा सर्वसामान्य भक्तासारखा मशिदीत प्रार्थनेसाठी गेला तसं प्रत्येकाने ईश्वराच्या दरबारात स्वतःला सर्वसामान्य समजून, स्वतःचा मान-सन्मान, मोठेपणा विसरुन नम्रता धारण केली पाहिजे. तसेच दानधर्मासारखं पुण्यकर्म करतानाही कष्टाचीच कमाई खर्च करावी या गोष्टी खरोखरच शिकण्यासारख्या आहेत.

                                                   - हसती दुनिया,मराठी 

                                   🙏🙏🙏🙏🙏                                   

Comments

Popular posts from this blog

दृष्टी

निसर्गाकडून शिकावे

संकटाला सामोरे कसे जावे ?