दैवी सद्गुणांचा सुगंध

 दैवी सद्गुणांचा सुगंध


सुगंधी फुलं कुठेही ठेवली, तरी ती सुगंधच पसरवतात. तशी सदगुणी माणसं कुठेही गेली, तरी ती आपले सद्गुणच पेरत असतात.


एकदा गुरु नानकदेवजी महाराज बाला आणि मर्दाना या आपल्या दोन शिष्यांसोबत पश्चिम बंगालच्या यात्रेवर निघाले होते. वाटेत त्यांना एक गाव लागले. रात्र इथंच घालवावी व दुसऱ्या दिवशी सकाळी पुढे जावे असे ठरवून ते एका झाडाखाली पारावर थांबले. दिवसभर चालून थकल्यामुळे त्यांना भूकही लागली होती. त्या गावात कुठे निवारा मिळेल का, म्हणून चौकशी केली; पण कोणीही त्यांना थारा दिला नाही. उलट त्यांना वाईट-साईट बोलून हाकलून दिले. ती रात्र त्यांनी उपाशीपोटी पारावरच घालवली. सकाळी उठल्यावर गुरु नानक देवांनी ईश्वराचे आभार मानत गावकऱ्यांसाठी आशीर्वाद मागितला, हे प्रभो! या गावातील लोक याच गावात राहून आनंदाने नांदोत. पुढे मजल-दरमजल करत ते दुसऱ्या गावात पोहचले. दुपारची वेळ झाली होती. ऊन्हाचा तडाखा आणि पोटातील भूक वाढली होती. ते एका झाडाखाली थांबले असताना काही गावकरी तेथे गोळा झाले. त्यांनी नानकदेवांचे तेज पाहून त्यांची विचारपूस केली. त्यांना भोजन आणि पाणी दिले. त्या दिवशी त्यांना तिथेच रहायला भाग पाडले. रात्री त्यांनी गावकऱ्यांशी ज्ञानचर्चा केली व सर्वांना आशीर्वाद दिले.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ईश्वराचे आभार मानत गुरुदेवांनी गावकऱ्यांसाठी आशीर्वाद मागितला, हे प्रभो! या गावातील लोक हे गाव सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहोत.


गुरुदेवांनी पहिल्या गावातील दुराचारी लोकांसाठी आशीर्वाद मागितला, की ते याच गावात सुखाने राहोत आणि या सदाचारी लोकांसाठी मात्र इतरत्र जाऊन रहावे असा आशीर्वाद का मागितला ? हा प्रश्न मर्दानाला पडला. त्याने गुरुदेवांना या बाबत विचारले असता गुरुदेव नानकदेवजी म्हणाले, पहिल्या गावातील लोक उद्घट, स्वार्थी आणि दुराचारी होते. ते कुठेही गेले तरी दुर्गुणच पसरवतील; परंतु दुसऱ्या गावातील लोक मात्र सदाचारी होते, ते कुठेही गेले तरी सद्गुणच पसरवतील आणि आज समाजात अशाच लोकांची गरज आहे त्यामुळे असे सदाचारी लोक एकाच ठिकाणी न रहाता ठिकठिकाणी राहिले तर तेथील लोकही सद्गुणी होतील.


सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या भेटण्याने इतरांना हर्ष होत असेल, इतरांना आनंद होत असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या निघून जाण्याने इतरांना आनंद होत असेल, तर आपल्याला आपल्या वागण्यामध्ये आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे, बदल करण्याची गरज आहे.

बिखरो तो फूलो की तरह, 
 महको तो खुशबू की तरह| 

आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता, माणुसकी, एकत्व यांसारखे सद्गुण धारण करायचे आहेत. या गोष्टींना, या दैवी गुणांना फक्त वाचण्यापुरते, बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करायचा आहे. मी घरात असेन किंवा ऑफिसमध्ये, शाळेमध्ये असेन किंवा मैदानात माझ्या मनामध्ये तोच एकत्वाचा, प्रेमाचा भाव जागृत राहायला हवा.


या पूर्वीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा जी....

🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दृष्टी

निसर्गाकडून शिकावे

संकटाला सामोरे कसे जावे ?