दृष्टी

 

दृष्टी 




एका गावात सदानंद नावाचा एक अंध तरुण राहत होता. नेहमीच्या सवयीने तो गावात सहजपणे हिंडू फिरु शकत असे. एकदा गावातील परोपकारी सज्जनांनी सदानंदाला शहरात नेऊन त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचे ठरवले; परंतु सदानंदाने ठाम नकार दिला. तो म्हणाला, आतापर्यंत डोळ्यांवाचून माझं काही अडलं नाही. यापुढेही काही अडून राहणार नाही.


एके दिवशी सदानंद गावापासून जवळच राहत असलेल्या आपल्या मित्राकडे गेला. संध्याकाळी त्याला घरी परतायचे होते; परंतु आता लवकरच काळोख पडेल म्हणून मित्राने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जा म्हणून सांगितले. त्यावर सदानंद मित्राला म्हणाला, “मला एक कंदिल पेटवून दे.... मित्र म्हणाला,”.... पण तुला त्या कंदिलाच्या प्रकाशाचा काय उपयोग ? तू तर दिवसा उजेडातही पाहू शकत नाहीस.”


 सदानंद म्हणाला, "मित्रा, तू म्हणतोस ते खरय. पण माझ्याजवळचा पेटता कंदिल पाहून रात्रीच्या अंधारात समोरुन येणारी व्यक्ती तरी मला घडकणार नाही. " मित्राला त्याचे म्हणणे पटले. सदानंद जळता कंदिल घेऊन निघाला. पुढे अचानक त्याला एका माणसाचा धक्का लागला आणि तो खाली पडला. सदानंदाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, "बाबा रे तू पण माझ्यासारखाच अंध आहेस की काय? माझ्या हातातील कंदिल तुला दिसला नाही?" त्यावर तो माणूस म्हणाला, "क्षमा कर, मी अंघ नाही; पण तुझ्या हातातला कंदिल विझला आहे; मग तो मला कसा दिसणार ?"


आता सदानंदाला पटलं की, काठी, दिवा ही साधनं वापरून माझं जीवन सुसह्य होणार नाही, तर मला दृष्टी प्राप्त केली पाहिजे.


मित्रांनो, जर दृष्टी नसेल तर पावलोपावली ठेच लागते. तशी ज्ञानदृष्टी नसेल, शिक्षण नसेल तर जीवनात पदोपदी अडथळे येतच राहणार. जीवन परावलंबी बनते. बरेच जण असंही म्हणतात की, शिकून कुठे मी मोठा कलेक्टर होणार आहे? माझ्या आजोबा-पणजोबांचं शिक्षणावाचून कुठं काय अडलं? पण असा विचार करणाऱ्यांची स्थिती ही सदानंदासारखी होऊ शकते. म्हणून शिकलं पाहिजे, केवळ साक्षरच नाही तर सुसंस्कृतही झालं पाहिजे. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. असंही म्हटलेलं आहे. म्हणूनच भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. भौतिक ज्ञानाने सुबत्ता प्राप्त होते तर आध्यात्मिक ज्ञानाने जीवनात संपन्नता येते. सुखमय जीवन जगण्याची कला येते. 

 

हसती दुनिया मराठी 
जून 2016


या आधीची पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा जी. 


🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

निसर्गाकडून शिकावे

संकटाला सामोरे कसे जावे ?