वाचनाने घडतो माणुस

 वाचनाने घडतो माणूस 



                              हसती दुनिया मराठी मध्ये मी सुंदर असा लेख वाचला. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रकाशित झालेला हा सुंदर लेख खास आपल्यासाठी – 

मित्रांनो, आपण अनेकदा हे ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, की 'वाचाल तर वाचाल' किंवा 'वाचनाने घडतो माणूस' अर्थात ही केवळ सुभाषितं नसून प्रत्यक्ष जीवन जगलेली माणसं इतिहासात आढळून येतात. अशाच काही थोर व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे. छोट्या अब्राहमला पुस्तके वाचण्याची फार आवड होती. तो सतत काहीतरी वाचत असे. घरात आई स्वयंपाक करत असतानादेखील चुलीशेजारी बसून तो वाचन करत असे. कारण रात्रभर वाचण्यासाठी दिव्याचे तेल घालवणे त्यांना परवडत नव्हते. एकदा अब्राहमला वाटले, की आपण अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र वाचावे. त्याने अनेक ठिकाणी चौकशी केली; पण ते पुस्तक त्याला मिळाले नाही. असाच शोध चालू असताना त्याला कोणीतरी सांगितले, की गावातल्या एका श्रीमंत जमीनदाराच्या ग्रंथसंग्रहालयात वॉशिंग्टनचे चरित्र आहे. अब्राहम तडक जमीनदारांच्या घरी गेला; पण दरवाजावरच पाटी होती, 'पुस्तके मागू नयेत' परंतु अब्राहमने चिकाटी सोडली नाही. जमीनदाराने त्याला अनेकदा हाकलून दिले पण तो पुन्हा पुन्हा गेला. त्याने जमीनदाराचे पाय धरले. शेवटी जमीनदारही विरघळला. त्याने ते चरित्र अब्राहमला वाचायला दिले. अतिशय आनंदाने अब्राहम घरी आला आणि ते चरित्र वाचू लागला. रात्र झाली, जेवणं झाली, तरी हा वाचतच होता.

त्याने संपूर्ण चरित्र वाचले, तेव्हाच खाली ठेवले आणि तसाच झोपला. नेमका त्याच रात्री भरपूर पाऊस पडला. अब्राहमचे घर गळके होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याने पुस्तक पूर्ण भिजले. सकाळी पुस्तकाची ही अवस्था पाहून तो खूप रडला. पुस्तक घेऊन जमीनदाराकडे गेला आणि पुस्तकाचे पैसे फिटेपर्यंत त्याने जमीनदाराच्या शेतात मजुरी केली. मजुरी करत असतानाच तो मनात म्हणत होता एक दिवस मीसुद्धा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईन.

मित्रांनो, हाच अब्राहम पुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष देखील झाले.

प्रत्येक महापुरुषांचे जीवन हे वाचनामुळेच घडले. वाचनामुळे बुद्धीला चालना मिळते, कुतूहल निर्माण होतं, एखाद्या गोष्टीला खोलवर जाणून घेण्याची जिज्ञासा वाढते. वाचनामुळेच मनःशांती मिळते. आज दुर्दैवाने मोबाईल मध्ये जखडलेल्या लहान थोरांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. वेद, शास्त्र, ग्रंथ, पुराण, कुराण, गीता, बायबल इत्यादी अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला सहजरीत्या उपलब्ध आहे. या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी वेळ काढून आपल्या आवडीचे साहित्य वाचूया आणि वाचनसंस्कृती टिकवूया.

या पूर्वीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा जी.




🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दृष्टी

निसर्गाकडून शिकावे

संकटाला सामोरे कसे जावे ?