मानवता हाच खरा धर्म

 मानवता हाच खरा धर्म




प्रसिद्ध हिंदी लेखक आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या जीवनातील हा एक प्रसंग आहे. त्या काळात जातिभेद, शिवा-शिव, उच्चनीचता, कर्मकांड या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाई; परंतु आचार्य जरी ब्राह्मण कुळात जन्मलेले असले तरी ते हे सर्व भेदभाव मानत नसत. त्यांच्या मते मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.

एकदा ते आपल्या शेतातून घरी जात असताना त्यांना वाटेत एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर त्यांना दिसून आले, की शेतात मजुरी करणारी एक अस्पृश्य महिला रडत-ओरडत बेशुद्ध होऊन पडली. ते त्या महिलेजवळ गेले. तेव्हा त्यांनी पाहिले, की एक विषारी साप चावून निघून गेला होता. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या महिलेच्या पायाला जिथे सापाने दंश केला होता त्याच्या वरच्या भागात हाताने घट्ट दाबून धरले. विष शरीरात पसरु नये म्हणून घट्ट दाबून धरले; पण असे किती वेळ धरुन ठेवणार? पायाला बांधून ठेवण्यासाठी कुठे दोरीही दिसेना. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या गळ्यातले जानवे काढून त्या महिलेच्या पायास घट्ट आवळून बांधले. विषाचा प्रभाव पुढे वाढत गेला नाही. तेवढ्यात इतरही ब्राह्मण तिथे गोळा झाले. हजारीप्रसाद यांनी त्या अस्पृश्य महिलेला केवळ स्पर्शच केला नाही, तर जे पवित्र (यज्ञोपवीत ) जानवे आहे, ते तिच्या पायाला बांधले! हा केवढा मोठा अधर्म आहे असे त्यांना वाटले, म्हणून ते त्यांना दोष देऊ लागले. आचार्यांनी धर्म भ्रष्ट केला असा त्यांच्यावर आरोप केला. त्यांना समाजाबाहेर काढण्याची धमकी दिली; परंतु हजारीप्रसाद यांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. जानवे घट्ट बांधल्यानंतर ते त्या महिलेला उचलून दवाखान्यात घेऊन गेले. शेवटी त्या महिलेचे प्राण वाचले. महिलेचे प्राण वाचवले याचं अतीव समाधान हजारीप्रसाद यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

पुढे समाजातील ब्राह्मणांनी त्यांचा खूप छळ केला; पण त्यांनी मानवतेचं कार्य कधीही सोडलं नाही आणि आपल्या साहित्यातून, लेखणीतून, सगळ्यांना हीच शिकवण दिली, की मानवता हाच खरा धर्म आहे.



सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या जगामध्ये धर्माच्या नावाखाली, जातीपातीच्या नावाखाली भांडणं होत आहेत, वाद-विवाद होत आहेत. यामुळे राष्ट्रीय शांतता भंग होत आहे, म्हणजेच समाजाची, देशाची व संपूर्ण विश्वाची हानी होत आहे. म्हणून सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज म्हणतात की, 
एक उम्र भी कम पड जाती है
प्यार करने के लिए न जाने,
लोग  वक्त कहा से निकाल लेते है 
नफरत के लिए|
म्हणून संत तुलसीदास जी म्हणतात, 
दया धर्म का मूल है 
पाप मूल अभिमान,
तुलसी दया न छोडिये 
जब लग घट मे प्राण|
हजारो वर्षांपासून संत हीच मानवतेची, प्रेमाची, विश्वबंधुत्वाची, दयेची, करूणेची शिकवण आम्हाला देत आहेत.
हीच शिकवण आम्ही अंगिकारूया आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ची भावना आपल्यामध्ये जागृत करूयात.

या आधीची बोधकथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा जी...

🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दृष्टी

निसर्गाकडून शिकावे

संकटाला सामोरे कसे जावे ?