निसर्गाकडून शिकावे

 

निसर्गाकडून शिकावे



एक संत महात्मा आपल्या शिष्यासोबत एका जंगलामधून जात होता. चालता चालता ते एका उंच टेकडीवर आले. त्याच वेळी शिष्याचा पाय घसरला आणि तो घसरत घसरत दरीमध्ये पडू लागला. तेवढ्यात त्याच्या हातात एक बांबूचं झुडुप लागलं. त्या बांबूच्या छोट्या झुडपाला त्याने घट्ट पकडून ठेवलं. त्यामुळे तो दरीत पडता पडता वाचला. कारण बांबू लवचिक असल्यामुळे तो वाकला; परंतु मोडला नाही किंवा जमिनीतून उपटून निघाला नाही. त्यामुळे तो शिष्य कितीतरी वेळ तसाच लटकत राहू शकला. थोड्या वेळातच गुरुदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला हाताचा आधार देत वर खेचून घेतले. पुढे दोघेही चालू लागले. चालता चालता गुरुदेवांनी त्याला विचारले, “बाळ! ज्या बांबूने तुझा प्राण वाचवला तो बांबू तुला काही म्हणाला का?" शिष्य म्हणाला, “नाही गुरुदेव, कदाचित माझे प्राण संकटात असल्यामुळे मी लक्ष दिलं नसेल आणि दुसरं म्हणजे झाडाझुडपांची भाषादेखील मला येत नाही तेव्हा आपणच सांगावे.”


गुरुदेव मंदस्मित करत म्हणाले, “बाळ! दरीत पडता-पडता तू ज्या बांबूला पकडलं होतं, तो पूर्णपणे वाकलेला होता. तरीही त्याने आपली जागा न सोडता तुला आधार दिला आणि तुझा जीव वाचवला. ज्या बांबूला तू पकडून ठेवले होते तो फक्त वाकला, मोडून पडला नाही आणि तू हात सोडताच पुन्हा सरळ झाला. त्यावरुन बांबूने तुला एकच गोष्ट शिकवली, ती म्हणजे माणसाने वाईट परिस्थितीत काही काळ शांत राहावे, नमते घ्यावे आणि पुन्हा परिस्थिती बदलल्यानंतर पूर्ववत आनंदात जीवन जगावे. जीवनात अनेक असे प्रसंग येतात, जे आपल्याला मुळापासून उपटून टाकू पाहतात; परंतु या बांबूने हाच संदेश दिला आहे, की जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरीही वेळ प्रसंगी थोडसं सहन करत, नमतं घेऊन स्थिरचित्त राहावे. दोलायमान होऊ नये. कारण कुठलीही परिस्थिती ही कायम टिकत नसते. बांबूचा लवचिकपणा म्हणजेच विनम्रता. विनम्रपणा हा कमकुवतपणा नसून ही त्याची शक्ती असते. परिस्थिती बदलताच तो पुन्हा पूर्ववत होतो. खरंतर झाडाझुडपांची भाषा कोणालाही येत नाही; परंतु हीच झाडं झुडुपं आपल्याला स्वतःच्या आचरणाने प्रत्येक वेळी जी जी शिकवण देत असतात ती आपण ओळखली पाहिजे.”


 सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की, या परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीकडून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. जसं वृक्षांना फळं लागल्यावर ती अजूनच खाली वाकतात,झुकतात आपल्याला ही आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती करत असताना नम्र व्हायचं आहे,विनम्रता धारण करायची आहे. सागराप्रमाणे विशाल व सहनशील बनायचं आहे. नदीच्या वाहत्या पाण्याप्रमाणे  अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ ठेवायचं आहे.


या आधीची पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा जी.

🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दृष्टी

संकटाला सामोरे कसे जावे ?